"माझा बाप फुलं देतो… भक्त देवाला चढवतात… मग पुण्य कुणाला मिळतं?" ! एक खरखुरे वास्तव
झेंडूचा सडा आणि TRP ची पूजा
गोष्ट फार जुनी नाहीच. 2016 चे साल होते.दसऱ्याची सुट्टी असल्याने आम्ही टीव्ही लाऊन बसलो होतो .
पंकजा मुंडेंनी भगवान गडावरचा होणारा दसरा सोडून सावरगावात मेळावा घेणार असल्याचे जाहीर केले. आणि लगेचच विरोधकांच्या गिरणीत नव्या पीठाचं दळण सुरू झालं.
राजकीय, धार्मिक, सामाजिक सगळा मसाला मिक्स करून टीव्ही वाल्यानी थेट खिचडीच लावली.
गडावर काय होणार? गडाखाली काय घडणार ? पंकजाताईंच्या भाषणात किती आणि कसं बोलणार! याचीही आकडेवारी कॅमेरावाले मोजत होते.कोणत्या पायऱ्यांनी कोण वर जाणार हे पण सांगत होते — जणू देशाचं भवितव्य त्या पायऱ्यांवर लटकलेलं होत !
मंडळी तयारीला लागली. पण मेळाव्याच्या भाषणांची काळजी महंत, कार्यकर्ते, पक्षांना कमीच, आणि टीव्हीवाल्यांनाच जास्त होती .
त्यांच्या डोळ्यात "लाइव" ची सोनेरी फ्रेम चमकत होती —नेमका त्याच टायमाला माझा भाऊ नागपुरात,अन बाप पुण्यात होता — पुण्यांच्या व्यवहारात मग्न असलेला बाप भक्तांसोबत फुलांचा सौदा करत,रस्त्यावर फुलं मोजत बसला होता ,
पण त्याच्या हातात फक्त रिकामा खिस्सा आणि डोळ्यांत पाणीच होतं.
कारण घामाच्या धारांत निथळलेल्या कष्टाचा मोबदला म्हणून बाप फुलांसाठी भाव मागत होता,
पण हे भक्त मात्र
“पूजेसाठी आहे ना…!थोडं कमी करा ,म्हणून फुलांचे भाव "देवाच्याच" नावाने पाडत होते."
माझ्या बापाच्या तळहातावरचे घट्टे, अंगावरचा मातीचा वास, आणि फुलांवर साठलेलं त्याचं घामाच पाणी —
हे सगळं ओरबाडून, कमी किमतीत फुलं घेऊन, देवाच्या चरणी चढवलं की खरंच पुण्य मिळतं का? माझा जाहीर प्रश्न!
मग तसं असेल तर पूजेसाठी फुकटात फुल देणारा माझा "बळी-राजा" नावाचा बाप अजूनही कुठल्या पापाची फळं भोगतोय,
हा प्रश्न मी थेट त्या देव नावाच्या व्यवस्थापकालाच विचारतोय!
प्रतीकात्मक चित्र
इकडे बायको शेतात सर्वा वेचत होती.
अन तिकडे बाप बोलून बोलून घसा कोरडा केलेल्या माझ्या बापाच्या झेंडूला भाव मिळत नव्हता म्हणून बा .. रस्त्यावर फुलांचे ट्रक रिचवून सडा घालत होता.
मी मात्र टीव्ही पुढे अधून मधून चष्मा पुसत डोळे लाऊन बसलो होतो.
"कदाचित आमची फुलंही टीव्हीत झळकतील" या भाबड्या आशेवर!
पण तेव्हा अचानक टीव्हीवरची बाई ओरडली —
"आता अत्यंत महत्त्वाचे अपडेट… नागपूरच्या रेशीमबागेतून थेट LIVE येतोय !"
आणि कॅमेरा वीजेच्या वेगाने सावरगावातून नागपूरला उडाला.
सर-संघचालक काय बोलणार? कोणती तलवार कशी पूजणार? — या तपशिलाने आठ वाजेपर्यंत टीव्हीचा स्क्रीन भरला होता .
आणि त्याच दिवशी नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर लाखोंचा जनसमुदाय जमला होता, पुस्तकांचा सागर उभा होता —
पण त्या कॅमेऱ्यांना हा नजारा दिसलाच नाही. त्यांच्या लेन्समध्ये ‘समाज’ नावाचा फिल्टर लागत असावा, जो त्यांच्याकडे कधीच नसतो .
एवढ्यात खिरीत साखरऐवजी चटणीची फोडणी टाकत बायकोने विचारलेच .
"आबा, भाऊजीची फुलं दिसतात का टीव्हीत कुठे ?"
"अगं, भागवतांचं पूजन संपलं की दिसतील…" मीही आशावादी बापाप्रमाणे पुटपुटलो.
पण तेवढ्यात मातोश्रीवरून उद्धव ठाकरेचे निघालेलं वऱ्हाड शिवाजी पार्ककडे वळलं,
कॅमेरे फाटकांची गणना, पायऱ्यांची उंची, स्टेजवर बसलेल्या माणसांच्या चेहऱ्यावरून "कसं वाटतंय?" या जड प्रश्नाचं उत्तर शोधू लागले.
एवढ्यात रात्री १० वाजता उद्धव ठाकरे दसरा मेळाव्याची भाषा आणि भाषण बोलून झाले.
आमचे नवरा बायकोचे डोळे जळत होते, पण मी तरीही टीव्ही च्या स्क्रीनला चिकटलो होतो —
कारण त्या दिवशी झेंडूला अजिबात भाव नव्हता, आणि माझा बाप रस्त्यावर बसून उर बडवत होता. माझे सख्खे भाऊ रस्त्यावर फुले फेकून साडेतीन मुहूर्ताला " राजानं मारलं आणि पावसानं झोडपलं " म्हणुन स्वतःच स्वतःचे गाल शेकून घेत होते.
त्याच्या डोळ्यांतलं पाणी कोणत्याच टीव्ही च्या टी. आर. पी. मीटरमध्ये मोजलं जात नव्हतं.
मेळावा संपला, म्हंटल आता तरी एखाद्या कोपऱ्यात माझा बा दिसेल .., त्यांची लाईव्ह बातमी दिसेल..माझा भाऊ सापडेल ..रस्त्यावर विखुरलेली फुले हि फाटक्या आभाळात ढगात लपून बसलेल्या देवाला दाखवतील
म्हणतील "डोळे असून अंधळ्या झालेल्या इथल्या व्यवस्थेला हे दिसत नाही .पण तुझ्याच पूजे साठी घाम गाळून साठवलेली फुले निदान तू तरी पहा !"
पण देव आंधळा!ढगा आड दडला होता, माध्यमं मुकी-बहिरी, आंधळी झाली होती!
माझ्या हातातील रिमोट सैरभैर चॅनल बदलत होते टीव्हीचे कॅमेरे आता बरेच स्थिरावले होते.टीव्हीवर आता फक्त विश्लेषण, चिकित्सा, पक्षनिष्ठांचे पोटभर पॅनल्स लागले होते.
माझ्या बापाची फुलं तिथे नव्हती.
माझा शेतकरी भाऊ त्यात कुठेच दिसत नव्हता.
मी चिडून बातमी लिहायला घेतली
दुसऱ्या दिवशी ती पेपरच्या एका कोपऱ्यात होती , कॉलमच्या सावलीत, कुणाच्याच नजरेस न पडता ती पडून होती — जशी रस्त्यावरची आमची झेंडूची फुलं.
मी चिडून बातमी लिहायला घेतली
दुसऱ्या दिवशी ती पेपरच्या एका कोपऱ्यात होती , कॉलमच्या सावलीत, कुणाच्याच नजरेस न पडता ती पडून होती — जशी रस्त्यावरची आमची झेंडूची फुलं.
आणि त्याच दिवशी रात्रीचे बारा वाजण्यापूर्वी आम्ही दोघां नवरा बायकोनी मिळून दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर घरातल्या टीव्हीवर दगड ठेवला तो कायमचा!
आज इतक्या वर्षानंतर पावला पावलावर दाराशी येणार मरण आम्ही थांबवलं आहे .ज्या आरशात आमचा चेहराच दिसत नसेल तो आरसा घरात ठेवायचा तरी कशाला? म्हणून आम्ही हा आरसा कायमचा काढून टाकलाय!
आता माझ्या बायकोच्या हातात पूजेच्या पंचपात्रा ऐवजी दोन वाट्या आहेत .एकीत थोडसं सुख आहे आणि दुसरीत थोड समाधान ! ती आता व्यवस्थे पुढे भिक मागत नाही .आणि कुठल्याच देवापुढे कधीच हात पसरत नाही . कारण तिने निसर्गाचे स्वामित्व आणि बुद्धाचे अस्तित्व मान्य केले आहे .
माझा बाप झेंडू उगवूच देत नाही . टीव्हीवरचा तो दगड अजून तसाच आहे, फक्त काचेऐवजी आता आत्मसन्मानावर कधीच धूळ बसत नाही!
लेखा बद्दल आपल्या प्रतिक्रिया नक्की द्या!
लेखक :गजानन खंदारे रिसोड
या लेखातील विचार, मते आणि विश्लेषण हे पूर्णपणे लेखकाचे वैयक्तिक असून ते कोणत्याही धार्मिक, सामाजिक किंवा राजकीय संस्थेच्या अधिकृत भूमिकेचे प्रतिनिधित्व करत नाहीत. लेखातील उल्लेख हे साहित्यिक, प्रतीकात्मक आणि व्यंगात्मक संदर्भात मांडलेले आहेत. कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा समूहाचा अपमान करण्याचा लेखकाचा हेतू नाही.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा