... अन पंढरपूरची चंद्रभागा स्वच्छ झाली !
👉 कामानिमित्त माझा दैनंदिन प्रवास नेहमीच सुरू असतो. मात्र, वर्षातून एकदा तरी मी फॅमिली सह पर्यटनाला जात असतो. यावर्षीही जाऊ जाऊ म्हणता दोन महिने उलटले. शेवटी पावसाळा सुरू झाला. जायचे तर होतेच त्यामुळे निर्णय घेतला आणि क्रूझर गाडी करुन आम्ही चार फॅमिली पंढरपूर, कोल्हापूर सह गडकिल्ले पाहण्यासाठी दि. 21 जून 2025 रोजी सायंकाळी मार्गस्थ झालो.
या चार दिवसांच्या एकूणच प्रवासात अनेक ऐतिहासिक तथा धार्मिक ठिकाणांना भेटी दिल्यात. महाराष्ट्राचा सांस्कृतिक, धार्मिक आणि ऐतिहासिक ठेवा अनुभवला.
या प्रवासात गड किल्ल्यांच्या भेटीने तेथील दुरावस्था पाहून मन गहिवरून आले.
पुढील प्रवास वर्णनात याबद्दल सविस्तर लिहीत आहेच.
हे प्रवास वर्णन चार दिवसांचे असल्यामुळे इतर प्रवास वर्णनांपेक्षा बरेच विस्तृत असणार आहे.
जास्त पाल्हाळीक न लिहिता ठळक मुद्द्यांवरच लिहीत आहे.
शनिवारी दि. 21 जून 2025 रोजी रात्री 9 वाजता आम्ही प्रवास सुरू केला.
ड्रायव्हरच्या ( शेषराव बोरकर, रिठद ) झोपेचा अंदाज घेत रात्रीत जेवढे अंतर कापता येईल. तेवढे कापून मुक्काम करूयात. असे ठरवून आम्ही प्रवास सुरू केला. सेनगाव मार्गे जिंतूर गेल्यानंतर जिंतूर येथे मुक्काम करण्याचे ठरले.
जिंतूर येथील एका टेकडीवर निसर्गरम्य परिसरात असलेल्या आणि जैन धर्मियांचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या श्री दिगंबर जैन अतिशय क्षेत्र नेमगिरी संस्थान येथे मुक्काम केला. त्या ठिकाणी असलेल्या धर्म शाळेत राहण्याची उत्तम व्यवस्था होती. दुसऱ्या दिवशी दि. 22 जून रोजी सकाळीच 6 वाजता तयारी करून श्री दिगंबर जैन संस्थान येथे दर्शन घेतले. हे संस्थान पाहून आणि तेथील स्वच्छता आणि निसर्गरम्य परिसर पाहून मन प्रफुल्लित झाले. या संस्थांवर भगवान महावीरांची मूर्ती ही जमिनीच्या किंचित वर तरंगती असल्याचे दिसून आले. मूर्तीच्या खालून एखादा कापड जरी काढला तर सहज निघून येतो. यामध्ये निसर्गाची अद्भुत कला असल्याचे जाणवले. तेथून दर्शन घेऊन आम्ही पुढील प्रवासास मार्गस्थ झालो.
त्यानंतर परळी वैजनाथ येथे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री वैद्यनाथ देवस्थान येथे वैद्यनाथाचे दर्शन घेतले. या प्राचीन देवस्थानची पाहणी करून पुढे अंबाजोगाई व नंतर तुळजापूर गाठले. साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या तुळजापूर येथील देवीचे प्राचीन मंदिर बघितले आणि दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ झालो. दिवस मावळतीला येत होता.
कुठेतरी मुक्काम करून दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातील सर्वात मोठा भुईकोट किल्ला असलेल्या नळदुर्ग या किल्ल्याला पाहण्यासाठी जायचे होते.
त्यामुळे किल्ल्याच्या जवळचे ठिकाण म्हणून अक्कलकोट येथील स्वामी समर्थ संस्थान येथे भेट देऊन येथेच मुक्काम केला.
तिसऱ्या दिवशी दि. 23 जून रोजी सकाळीच तयारी व चहा, नाश्ता घेऊन नळदुर्ग किल्ल्याकडे आगेकूच केली.
नळदुर्ग हा महाराष्ट्रातील भुईकोट किल्ल्यांमधील सर्वात मोठा आणि बरेचसे बांधकाम शाबूत असणारा मोठा किल्ला. हा किल्ला पाहण्याची उत्सुकता मला अनेक वर्षांपासून होती. किल्ल्याच्या मधोमध वाहणारी नदी आणि त्या नदीच्या प्रवाहात असणारे पाणी महल हे या किल्ल्याचे विशेष आकर्षण होते.
या किल्ल्याच्या पाहणीनंतरचा अनुभव बघण्याआधी आपण या किल्ल्याची पार्श्वभूमी जाणून घेऊया....
अक्कलकोट येथून 42 किलोमीटर असणारा नळदुर्ग हा किल्ला मराठवाड्यातील महत्त्वाचा भुईकोट किल्ला आहे. हा किल्ला म्हणजे मध्ययुगीन स्थापत्य शैलीचा उत्कृष्ट नमुना होय. या किल्ल्याचे बांधकाम नळ राजाने केल्यामुळे किल्ल्याचे व या गावाचे नाव नळदुर्ग पडले. त्यानंतर बहामनी काळात ई. स. १३५१ ते १४८० व नंतर आदिलशाही कालखंडात ई. स. 1558 मध्ये या किल्ल्यास दगडी चिऱ्यांची मजबूत तटबंदी बांधण्यात आली. इब्राहिम आदिलशहा दुसरा यांच्या काळात ई. स. 1613 मध्ये बोरी नदीवर बंधारा बांधून पाणी महालाचे बांधकाम करण्यात आले. हा पाणी महाल म्हणजे स्थापत्यशैली आणि अभियांत्रिकीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. हुलमुख दरवाजा हे प्रमुख प्रवेशद्वार असून या किल्ल्याला 114 बुरुज आहेत. काही बुरुजांवर आजही तोफा आहेत. या किल्ल्यात अंबरखाना, मुनसिफ कोर्ट, मशिद, बारादरी, पाणीमहल, रंगमहल, हत्ती तलाव, मछली तट आदींचे अवशेष आहेत. हा किल्ला महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व व वास्तुसंग्रहालय विभागाचे राज्य संरक्षित स्मारक आहे.
तब्बल 126 एकर परिसरात असलेल्या या किल्ल्यातील अनेक बांधकामे आजही साबूत आहेत. काही इमारतींचे गेल्या 50 - 100 वर्षात नूतनीकरण केल्याचे दिसून येते.
या किल्ल्याच्या मधोमध बोरी नदी असून याच नदीचे पाणी अडवून बंधारा बांधून "पाणी महल" तयार करण्यात आले आहेत. या बंधाऱ्यात तीन पाणी महल असून आजही साबूत आहेत. बंधाऱ्याच्या दिशेने भिंतीवर मोठ्या प्रमाणात पाणी आदळत असतानाही थेंबभर पाणी सुद्धा या पाणी महालात शिरत नाही. या बंधाऱ्याला समांतर दोन बाजूंनी दोन "ओव्हर फ्लो" आहेत. दोन्ही ओव्हर फ्लो ला "नर" धबधबा आणि "मादी " धबधबा या नावाने ओळखले जाते. आम्ही गेल्यानंतर पश्चिम दिशेच्या ओव्हर फ्लो मधून पाणी बाहेर पडत होते. हा नजारा म्हणजे डोळ्याचे पारणे फेडणारा होता. बंधाऱ्याच्या पाणी प्रवाहाच्या समोरील बाजूने 50 फुटांपेक्षा अधिक खोलवर धबधब्याचे पाणी आदळत होते. हे दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. नुकताच पावसाळा सुरू झाल्यामुळे बंधारा पूर्णपणे भरलेला दिसून आला. जणू एखादा तलाव भासेल एवढे पाणी या बंधाऱ्यात साठवलेले दिसून आले. ही नैसर्गिक नदी किल्ल्याच्या मधोमध घेऊन त्याकाळी किल्ल्यातील रहिवाशांना पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था केली असावी. या नदीसह किल्ल्याच्या पश्चिम बाजूला सुद्धा एक मोठी नदी आहे. त्या नदीच्या काठावर किल्ल्याची दुसरी भिंत आहे.
पाणीमहल पाहिल्यानंतर आम्ही किल्ल्याच्या मधोमध असलेल्या उंच बुरुजावर गेलो , तेथून किल्ल्याचा संपूर्ण परिसर नजरेस पडला. किल्ल्यातून प्रवेश केल्यानंतर मध्यंतरी साबित असलेले मुनसिफ कोर्ट चे बांधकाम बघितले. तेथूनच पुढे एक मज्जिद आहे. बाजूला राजांचा राजमहल असून त्याचे अलीकडील काळात नूतनीकरण केल्यामुळे ती इमारत आजही सुंदर दिसते. येथेच 25 फूट लांबीची भली मोठी तोफ आहे. पश्चिम दिशेला सुस्थितीत असलेला "रंग महाल" आहे. ही सर्व ठिकाणे त्या काळातील किल्ल्याची भव्य - दिव्यता अधोरेखित करतात.
हा किल्ला पाहिल्यानंतर हा ऐतिहासिक ठेवा जतन करून ठेवावा असे शासनास वाटत नसावे का? हा प्रश्न माझ्या मनात आला.
या प्रशस्त किल्ल्यात पुरातत्व विभागाचा केवळ एक अधिकृत कर्मचारी आहे. आणि एक कंत्राटी कर्मचारी आहे. कंत्राटी तत्वावर असलेल्या कर्मचाऱ्याची आणि आमची किल्ल्यातून बाहेर पडताना प्रवेशद्वाराजवळ भेट झाली. नोंदवहीत त्यांनी आमच्या नोंदी घेतल्या. किल्ल्याचे निरीक्षण करत असताना तेथे वावरणाऱ्या लोकांकडून आम्ही माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला असता असे कळाले की 1998 मध्ये एका कंपनीला हा किल्ला भाडेतत्त्वावर दिला होता. यावेळी त्यांनी किल्ल्यामध्ये विविध ठिकाणी गार्डन्स तयार केले. सोयी सुविधा निर्माण केल्या. किल्ल्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी चहा नाश्त्याची अनेक दुकाने वेगवेगळ्या भागात थाटली गेली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक येथे यायचे. मात्र, काही वर्षांपूर्वी या कंपनीला दिलेला कंत्राट संपला, त्यानंतर शासनाने पुन्हा कुणालाही कंत्राट दिला नाही आणि किल्ला पुन्हा वाऱ्यावर सोडला. त्यामुळे आज हा किल्ला शेवटच्या घटका मोजत आहे. पर्यटकांची संख्याही नगण्य आहे. महाराष्ट्राच्या दैदीप्यमान इतिहासाची साक्ष असणारा हा किल्ला येणाऱ्या पिढीसाठी एक अमूल्य ठेवा आहे. हा ठेवा जतन करावा असे शासनास वाटत नसावे का? असा प्रश्न माझ्या मनात निर्माण होतो. आणि शासनाप्रती प्रचंड चीड निर्माण होते. किल्ल्यातून बाहेर पडताना किल्ल्याचे दुःख आणि वेदना घेऊनच आम्ही बाहेर पडलो. बाहेर पडताना काही पर्यटकांना बोलते केले असता त्यांनीही या किल्ल्याचे जतन व संवर्धन व्हावे अशी भावना व्यक्त केली. तेथे असणारे कंत्राटी कर्मचारी हे प्रचंड अभ्यासू होते. त्यांनी डॉक्टरेट केलेली होती. आमच्या किल्ल्याविषयी असणाऱ्या भावना त्यांच्याकडे व्यक्त केल्या. आणि शासनास कळविण्याची विनंती केली.
साधारणतः तीन ते चार तासानंतर आम्ही किल्ल्यातून बाहेर पडलो.
संपूर्ण किल्ला पाहताना किल्ल्यातील प्रमुख ठिकाणांचे मी चित्रीकरण केले . या चित्रीकरणाचा स्वतंत्र ब्लॉग बनवून मी माझ्या यूट्यूब चॅनलवरून प्रसारित करणार आहे. लवकरच तो आपल्यापर्यंत पोहोचेल.
आम्ही किल्ल्यात जात असताना सकाळी जेवण केलेले नसल्यामुळे पंढरपूर कडे येत असताना सोलापूर येथे मराठमोळ्या हॉटेलवर जेवण केले.
सायंकाळी महाराष्ट्राचे आराध्य दैवत पांडुरंगाच्या पंढरीत प्रवेश केला. येत्या काही दिवसात आषाढी एकादशी असल्यामुळे पंढरपुरात लाखो भक्तांचा मेळावा जमणार आहे. हजारो दिंड्या वेगवेगळ्या मार्गांनी पंढरपूरकडे मार्गक्रमण करत आहेत.
त्यामुळे साहजिकच पंढरपुरात आतापासूनच वारकऱ्यांची रीघ सुरू झाली आहे.
आम्ही पंढरपुरात दाखल झाल्यानंतर तेथील परिसर व चित्र मनाला प्रसन्न करून गेले.
विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या अगदी समोरूनच चंद्रभागा ही नदी वाहते. या चंद्रभागेतील स्नानाला अतिशय महत्त्व आहे. पूर्वी येथे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे भाविकांना असुविधांचा सामना करावा लागत होता असे ऐकून होतो.
मात्र, आम्ही येथे गेल्यानंतर चंद्रभागेचे पात्र पूर्णपणे भरलेले होते. सातारा जिल्ह्यातील अजनी धरणाचे पाणी या नदीपात्रात सोडल्याचे तेथील स्थानिकांनी सांगितले. नदीच्या कडेचा परिसर अतिशय स्वच्छ दिसून आला. नदी काठावर ठिकठिकाणी स्वच्छतागृहे व बाथरूम्स दिसून आले. अगदी नियोजनबद्ध पद्धतीने विठ्ठल भक्त चंद्रभागेत आंघोळ करत होते. पाण्याच्या प्रवाहात कोणी वाहून जाऊ नये म्हणून रक्षण करणारी एक बोट सारखी फिरून पाण्याच्या मुख्य प्रवाहात जाऊ नका अशा सूचना देत होती. पंढरपुरातील एकूणच वातावरण आल्हाददायक वाटले. यामागचे कारण शोधले असता महाराष्ट्रातील कर्तव्यदक्ष आणि इमानदार आय ए एस अधिकारी तुकाराम मुंडे साहेब हे पंढरपूर मध्ये असताना त्यांनी मोठ्या प्रमाणात बदल करून स्वच्छ आणि सुंदर पंढरपूर साकारल्याची माहिती मिळाली. सोबतच त्यांनी तेथील शेकडो एकर वरील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण काढून तेथे दिंड्यांसाठी मुक्कामाची स्वतंत्र व्यवस्था केल्याचे दिसून आले. एकंदरीत पाहता महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपुरात आल्यानंतर कुणालाही असुविधेचा सामना करावा लागणार नाही अशी परिस्थिती तेथे दिसून आली. मन प्रसन्न झाले. नंतर दर्शन बारी मध्ये लागून दीड ते दोन तासात दर्शन झाले. यावेळी आमच्या सोबत असलेल्या महिलांचा दर्शनानंतरचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता.
महाराष्ट्रातील शेतकरी कष्टकऱ्यांच दैवत म्हणजे पंढरीचा विठ्ठल होय. त्यामुळे येथे आल्यानंतर सर्व "धाम" केल्याची अनुभूती विठ्ठल भक्तांना येत असते.
आम्हीही विठ्ठलाच्या भेटीने कृतकृत्य झालोत.
मंगळवार दि. 24 जून रोजी सकाळीच तयारी करून आम्ही कोल्हापूरकडे मार्गस्थ झालो. सकाळी नऊ वाजता कोल्हापूर गाठले.
दरम्यान सांगली पासून पुढे निघाल्यानंतर जोराचा पाऊस सुरू होता. "फोर लेन हायवे" आणि पावसाची रिपरीप तसेच सभोवताली असलेला हिरवागार निसर्ग आमचे डोळ्यांचे पारणे फेडत होता. दरम्यान, अनेक ठिकाणी आम्ही गाडी थांबवून निसर्गाचे अद्भुत स्वरूप अनुभवले. सेल्फी काढून फोटो कॅमेऱ्यात कैद केले.
कोल्हापूर पोहोचल्यानंतर तेथे एका मराठमोळ्या अस्सल कोल्हापुरी हॉटेलमध्ये गरमागरम पुरी भाजीचा नाश्ता केला.
आणि थेट कोल्हापूर पासून 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या सिद्धगिरी महाराज गार्डन, सिद्धगिरी महाराज कनेरी मठ येथे पोचलो.
या मठातील अप्रतिम गार्डन आणि जुन्या काळातील गाव गाड्याचे जिवंत चित्रण असणारे शिल्प पाहण्याची अनेक वर्षांपासूनची इच्छा आज पूर्ण होणार होती.
प्रति मानसी 200 रुपयांचे तिकीट काढून आम्ही कनेरी मठात प्रवेश केला.
सुरुवातीला सिद्धगिरी महाराज गार्डन मध्ये प्रवेश केला. तेथे असलेल्या विविध फुले झाडांच्या बागेने मन मोहित झाले.
या बागेतील फुलांचे सौंदर्य म्हणजे शब्दांच्याही पलीकडे असणारे आहे.
या बागेतील प्रत्येक ठिकाणाचे क्षण आम्ही कॅमेराबद्ध केलेत.
तेथे असणाऱ्या मिनी रेलमधून बच्चे कंपनीने रेल सफारी केली.
बागेतून बाहेर आल्यानंतर शॉपिंग मॉल मध्ये खादीची काही कापड खरेदी केलेत.
यानंतर म्युझियम कडे गेलो.
म्युझियमच्या प्रवेशद्वारावरच एका खेडेगावाची हुबेहूब रचना असलेले छोटी छोटी घरे असलेले सुंदर गाव पाहण्यात आले.
त्यानंतर गुहे सारखी असलेल्या म्युझियम मध्ये प्रवेश केला. यामध्ये प्राचीन काळातील देवी देवता तसेच महापुरुषांचे देखावे साकारण्यात आलेले पाहण्यात आले. या गुहेतून बाहेर पडल्यानंतर साधारणतः पन्नास वर्षांपूर्वीचे ग्रामीण भागातील जीवनमान प्रत्यक्ष साकारणाऱ्या कलाकृती पाहण्यात आल्या.
एका विहिरीवरून गावातील सर्व लोक पाणी भरत आहेत. अशा पुतळ्यांच्या कलाकृती जुन्या काळातील आठवणीत घेऊन गेल्या.
कुणी शेतकऱ्याचा मुलगा गाई म्हशी चारत आहे. इकडे विहिरीतून मोटेने पाणी काढले जात आहे. एक शेतकरी कुटुंब पेरणी करत आहे. दुसरे शेतकरी कुटुंब शेतातील बैलांच्या साह्याने मळणी करत आहे. अशा अनेक कलाकृती तिथे आहेत.
वरच्या भागात आल्यानंतर पन्नास वर्षांपूर्वीच्या काळातील खेडेगावातील रचना जशीच्या तशी साकारलेली दिसून आली. आज ज्या जाती आपण पाहतो, त्या जातींचे त्याकाळी व्यवसाय होते. आणि व्यवसायावरूनच जाती पडल्याचे प्रकर्षाने जाणवते. माळ्याच्या मळ्यातील लोक फुले विकतात. न्हावी आपले कटिंग दाढीचे काम करतोय. कुंभार आपले मडके बनवण्याचे काम करतोय. कासार बांगड्या विकण्याचा व्यवसाय करतोय. शिंपी कपडे शिवण्याचे काम करतोय. सुतार लाकडी अवजारे बनवण्याचे काम करतोय, लोहार लोखंडी अवजारे बनवतोय अशा आजच्या अनेक जातीतील लोक त्याकाळी तो व्यवसाय करायचे. याचे जिवंत चित्रण या शिल्पांमध्ये दिसून आले. पुढे एक गावाच्या प्रमुख चौकात बाजार भरलेला दिसून आला. तिथे विविध दुकाने आणि त्या दुकानांवरून खरेदी करणारे ग्राहक हे चित्र खरोखरच डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. असे वाटत होते की तिथून निघूच नये.
तेथील शिल्प ज्या ही कलाकारांनी बनविले असतील त्या कलाकारांना सॅल्यूट केल्याशिवाय राहवत नाही.
पन्नास वर्षांपूर्वीची गावगाडा संस्कृती पहायची असेल तर या कनेरी मठाला आपण आवर्जून भेट दिली पाहिजे. सोबतच येथे असलेले माया महल, तारांगण, भूत बंगला, 7 डी थियेटर, शिव मंदिर, पतंजली जंगल हे सर्व पाहण्यासारखे आहे.
तेथेच दुसऱ्या बाजूला प्राचीन शिवमंदिर आहे.
वरतून मुसळधार पाऊस असताना सुद्धा आम्ही या कनेरी मठातील प्रत्येक ठिकाणाचे बारकाईने निरीक्षण केले.
या मठातून बाहेर पडताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अविस्मरणीय असा आनंद झळकत होता.
येथून आम्ही कोल्हापुरात आलो. सर्वप्रथम राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शाहू पॅलेस ला भेट दिली.
यापूर्वी मी अनेक वेळा कोल्हापूर येथे आलो होतो . मात्र, प्रत्यक्ष शाहू पॅलेस च्या आत जाण्याचा योग आला नव्हता. आज शाहू पॅलेस मधील म्युझियम बघितले. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनातील प्रत्येक वस्तूंचा संग्रह या ठिकाणी पाहण्यात आला. त्यांचे वेगवेगळे फोटो. त्यांनी वापरलेले साहित्य. राज दरबार, विविध स्वरूपाच्या तलवारी, बंदुका, विविध प्राण्यांचे हुबेहूब पुतळे, कौटुंबिक माहिती, यासह अनेक बाबी पाहण्यात आल्या. या पॅलेसची आतील भागातील डिझाईन आणि रंगरंगोटी , नक्षीकाम मन प्रफुल्लित करून गेले.
खऱ्या अर्थाने लोकराजा असलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा थाट त्याकाळी किती भव्य दिव्य असेल. त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारी त्यावेळेस ची रयत किती भाग्यवान असेल या सर्व बाबींची प्रचिती आम्हाला शाहू पॅलेस पाहिल्यानंतर आली.
पॅलेसच्या बाहेर आम्ही आठवणीसाठी फोटो घेतलेत. शाहू पॅलेस च्या समोरच प्राण्यांचे संग्रहालय सुद्धा आहे. हे सर्व पाहिल्यानंतर आम्ही साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराकडे गेलो.
ऐतिहासिक वारसा असलेल्या आणि दगडांचे अप्रतिम कोरीव काम असलेल्या या मंदिरात लवकरच दर्शन झाले.
तेथून बाजूलाच असलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या सभा मंडपाकडे गेलो. तेथे सुद्धा छत्रपती शाहू महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा पाहण्यास मिळाला. शंभर वर्षे जुने असलेले आणि सुंदर नक्षीकाम केलेले हे सभागृह एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी नाही.
महालक्ष्मी मंदिराचा हा एकूणच परिसर पाहून आम्ही बाहेर पडलो.
कोल्हापूरला गेलो आणि कोल्हापुरी चप्पल घेतली नाही असे होणार नाही.
त्यामुळे आम्ही सर्वांनी ओरिजनल कोल्हापुरी चप्पल खरेदी केल्यात. लहान मुलांना खेळणी व इतर साहित्य खरेदी केले.
आणि इथून परतीचा प्रवास सुरू केला. सायंकाळी 7 वाजता सांगली येथे आल्यानंतर माझे जिवलग मित्र, फ्युजन डान्स अकॅडमी सांगली चे सर्वेसर्वा, कोरिओग्राफर सुरज वाघमोडे यांची बऱ्याच वर्षानंतर भेट झाली. तेथे चहा पाणी घेतल्यानंतर आम्ही पुन्हा पंढरपूर कडे रवाना झालो. रात्रीचा मुक्काम पंढरपूर येथेच केला.
दि. 25 जून रोजी सकाळीच चंद्रभागेत स्नान करून पुन्हा विठुरायांचे दर्शन घेतले. पंढरपुरातील प्रसिद्ध कैकाडी महाराज मठ बघितला. आणि पुढे मार्गस्थ झालो.
परत येत असतांना कुर्डूवाडी येथे जेवण करून किल्ले धारूर गाठले.
धारूर येथील किल्ला पाहण्याचे आमचे आधीच नियोजन होते. धारूर येथे आल्यानंतर धारूर गावाला लागूनच असलेल्या किल्ल्यावर पोहोचलो.
धारूर किल्ल्याबद्दल प्राथमिक माहिती पुढील प्रमाणे...
सध्याच्या या धारूर किल्ल्याला प्राचीन काळात "महादुर्ग" म्हणून ओळखले जायचे. हा किल्ला राष्ट्रकूट राजांनी आठ ते दहाव्या शतकात बांधला. बहमनी राज्याच्या नंतर छोटे शासक बरीद शाही व नंतर आदिलशाहीने या किल्ल्यावर अधिकार मिळविला. आदिलशाहीचा सरदार किश्वर खान यांनी 1567 मध्ये या किल्ल्याचे नूतनीकरण केले. 1569 मध्ये निजामशाहीने हा किल्ला जिंकला व किल्ल्याचे फतेहबाद म्हणून नामकरण केले. पुढे 1630 - 31 मध्ये मुघलांनी ताब्यात घेतला. 1760 मध्ये नेताजी पालकर व पेशव्यांनी येथे राज्य केले. 1760 मध्ये उदगीर युद्धात या किल्ल्याची महत्त्वाची भूमिका राहिली. स्वातंत्र्यापूर्वी बहुतेक वेळा हा किल्ला निजामाच्या राजवटीखाली होता. हा भुईकोट किल्ला असून गावाच्या दिशेने खंदक व दुहेरी तटबंदी आहे. मागच्या बाजूंनी नैसर्गिक दरी आहे. आत "गोडी दिंडी" नावाचा अर्थ गोलाकार तलाव आहे.
या किल्ल्यात जेव्हा आम्ही प्रवेश केला तेव्हा प्रवेशद्वारावर कोणीही आढळून आले नाही. संपूर्ण किल्ला फिरून झाल्यानंतर सुद्धा तेथे पुरातत्व विभागाचा एकही कर्मचारी दिसून आला नाही. म्हणजेच येथे शासनाचे कुठलेही नियंत्रण नसल्याचे दिसून आले. या किल्ल्याचे बहुतांश बांधकामांची पडझड झाली असून केवळ अवशेष शिल्लक आहेत. दूर जाऊन अगदी खोल दिसणारा गोडी दिंडी तलाव या किल्ल्यातील रहिवाशांची तहान भागवत असावा. या तलावात आताही बरेच पाणी होते. किल्ल्याच्या दक्षिण बाजूने खूप मोठी दरी असून तेथे मोठा धबधबा असल्याचे माहित पडले. पुरेसा पाऊस नसल्यामुळे हा धबधबा सुरू झाला नव्हता.
ऐतिहासिक वारसा असलेल्या या किल्ल्याचे जतन व संवर्धन करण्यासाठी शासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे दिसून आले.
आम्ही पाहिलेल्या नळदुर्ग किल्ल्याची परिस्थिती आणि या धारूर किल्ल्याची परिस्थिती काही वेगळी नव्हती. गड किल्ले हे शासनाच्या पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत येतात. मात्र, पुरातत्व विभाग जाणीवपूर्वक अशा ऐतिहासिक गड किल्ल्यांकडे दुर्लक्ष करत आहे की काय असा प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण झाला आहे.
महाराष्ट्रातील सामान्य दुर्गप्रेमींना याबाबत काय वाटते हे सुद्धा कमेंट च्या माध्यमातून आपण कळवावे.
या किल्ल्यातून बाहेर पडल्यानंतर आम्ही पुढच्या परतीच्या प्रवासाला निघालो.
पुढे पाथरी, सेलू, मंठा, लोणार,, रिसोड मार्गे वाशिम येथेच स्थिरावलो.
हा प्रवास संपून आज एक आठवडा होत आहे. तरीसुद्धा प्रवासातील सर्व ठिकाणे आजही डोळ्यासमोर तरळतात. विशेषतः गड किल्ल्यांच्या संवर्धनाबाबत शासन ठोस भूमिका का घेत नाही हा प्रश्न सारखा मनाला सतावत आहे.
( टिप : मी दैनंदिन कामानिमित्त दररोज कुठेतरी प्रवास करत असतो. प्रवासादरम्यान अनेक अनुभव मला येत असतात. यातील काही निवडक अनुभव शेअर करण्यासाठी मी प्रवासातील अनुभव
शनिवार दि. 21 जून ते 25 जून 2025 दरम्यान "फॅमिली टूर" चे अनुभव...
हे सदर सोशल मीडियावर सुरू केले आहे . आजचा हा एकविसावा भाग आहे. हा अनुभव आपणास कसा वाटला हे आपल्या कमेंट च्या माध्यमातून जरूर कळवा. )
✍ गजानन धामणे
मुक्त पत्रकार, वाशिम
9881204538
धन्यवाद सर
उत्तर द्याहटवा