कावड यात्रा : भक्ती की मस्ती धार्मिकतेच्या नावाने आमची मुले बिघडतात का?

धार्मिकतेच्या नावाने आम्ही बिघडतो आहे का?


पटतंय का पहा! ✍  गजानन खंदारे


आज श्रावणातील शेवटचा सोमवार. रस्त्यांवर कावड मंडळांची  धूम होती. 10 ते 30 वयोगटातील युवक– एकसारख्या कपड्यात, DJ च्या तालावर थिरकताना दिसले. पावसात न्हाऊन निघालेली ही गर्दी जणू भक्तीने ओथंबली होती!  या गर्दीतून वाट काढतांना माझ्या मित्राच्या छातीत अचानक धडधड सुरु झाली. प्रेशर थोडं वाढल्याने तो बराच अस्वस्थ झाला. डॉक्टरा म्हणाले 85 डेसिबल पेक्षा आवाजाने रक्तदाब आणि अटॅक चा धोका वाढतो. – DJ पासून थोडं लांबच राहा.

 अलीकडे असे त्रास अनेकांना जाणवतात.  महिलांना सुद्धा अटॅक येण्याचे प्रमाण वाढले आहे.

“कावड आपली महाराष्ट्राची परंपरा आहे का? DJ आपली संस्कृती आहे का!”

 – मित्र जरा वैतागूनच बोलला.

सध्या श्रावण महिना सुरू आहे. विशेषतः या महिन्यात शिवाची उपासना केली जाते.  भक्ती हा श्रद्धेचा आणि आस्थेचा विषय आहे. उन्माद आणि मस्ती नव्हे!शंकर म्हणजे "भस्मधारी, स्मशान-निवासी – विरक्तीचा अनुभव " म्हणजेच वैराग्याची शिकवण देणारा आदर्श जोगी- भोगी नव्हे!

 श्रावण महिन्याला "भक्तीमास" असेही म्हटले जाते. पण खरी भक्ती नेमकी कशात आहे हे समजून घेण्यापूर्वी चुकीचा मार्ग दाखवणारे आणि त्याचे  अंधानुकरण  करणारे जास्त आहेत.

 यावर कुणी बोलण्याचा प्रयत्न केला तर तथाकथित धर्मरक्षक दगडगोटे घेऊन तयार असतात.

ज्या व्यवस्थेने “सत्य असत्याशी केले मन ग्वाही” म्हणणारे तुकाराम महाराजही सोडले नाहीत, तिथे सामान्य माणसाची काय कथा.

कालच का मंडळाने बेलाची झाडे लाऊन आपल्यातील सामाजिक जबाबदारी दाखवली. विशेषत: झाडं लावणाऱ्या महिला होत्या. आमच्या गावातील गणेश मंडळ " पारंपारिक बारी, रोग उपचार ई " अंगाने भक्ती जोपासते. अशी उदाहरणे खऱ्या भक्तीचे घडवतात.

वारकरी परंपरेत समता, भक्ती आणि सेवा यांचा आग्रह आहे. तर वैदिक परंपरेत यज्ञ कर्म कर्मकांडावर भर. दोन्ही परंपरा समाजात एकत्र नांदतात. मग परंपरेच्या नावाखाली अध्यात्म रुजवायचे की विकृती हे ठरवावं लागेल.

कावड यात्रा – भक्ती की मस्ती

उत्तर भारतात कावड यात्रा ही अनेक वर्षांची धार्मिक प्रथा आहे. अनेक युवक श्रद्धेने पायी चालत भोलेनाथाला गंगाजल वाहतात. यात भक्ती, संयम, साधना आणि नियम पाळले जातात. पण महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत कावड यात्रा सुरु झाली.  DJ,  आणि दंगामस्ती असा प्रकार सर्रास दिसतो आहे. मग प्रश्न पडतो – ही कुठली भक्ती?  की फक्त सोशल मीडियावर फोटो व्हिडिओसाठीचा कार्यक्रम. जेथे भक्ती असायला हवी तेथे गोंधळ का?

धार्मिक मिरवणुकांमध्ये आज DJ चा जोर वाढला आहे. कुठे गणेशोत्सव, कुठे कावड यात्रा, कुठे तिर्थयात्रा –नवरात्र, ई सर्वत्र DJ, बासचा आवाज.

 आपल्या भारतीय संस्कृतीत भक्तीचे मूळ भजन, कीर्तन, आरती, अभंग ई अनेक अंगानी पुढे जाते.  मग DJ वाजवून धर्म कसा टिकतो?  हा उत्सव भक्तीचा आहे की शो-ऑफचा. DJ वर मुलं डान्स करतात, दारू पितात, भांडणं होतात – ही संस्कृती आहे की असंस्कृती.

 आदर्शाचा -बाजार

काल परवा दही-हंडीच्या नावाने सेलिब्रेटीचा उत्सव झाला. 

गणेशोत्सव सुरू केला तेव्हा उद्देश होता – लोक एकत्र यावेत, सामाजिक जाणीवा निर्माण व्हाव्यात आणि राष्ट्रीय ऐक्य पसरावे हा हेतु असावा.आजचे गणेशोत्सव पाहिले तर लाखोंची लाईट सजावट, DJ स्पर्धा, फिल्मी गाणी, लाऊडस्पीकर्स, मोठमोठ्या मूर्तींसाठी स्पर्धा असे चित्र दिसते. मग प्रश्न पडतो – हा बाप्पाचा उत्सव आहे की इगो शर्यत.

धर्माचा खरा मार्ग कुठे आहे तर आपण धर्माच्या नावाखाली दिखाव्याची संस्कृती वाढवत आहोत.

शेवटी एकच -

धर्माचे ठेकेदारांनो, मुलं आमची बिघडतात कारण तुम्हीच धर्माचा मार्ग चुकीचा दाखवत आहात. भक्तीऐवजी दिखावा, परंपरेऐवजी स्पर्धा, संस्कृतीऐवजी DJ… हे थांबवलं नाही तर येणाऱ्या काळात धर्म जिवंत राहणार नाही; फक्त दिखाऊ व नावापुरता उरेल. धार्मिक व नैतिक मूल्य हरवलेली असतील.


© "शेती माती" साठी 


✍ गजानन खंदारे, रिसोड

लेखक हे स्वतंत्र लेखक असून सामाजिक तसेच इतर विषयांचे अभ्यासक आहेत.

अस्वीकृती :सामाजिक निरीक्षण व  ग्रंथ अभ्यास यावर आधारित हे लेखकाचे वैयक्तिक निवेदन आहे. समाज जागृती म्हणुन कोणत्याही व्यक्ती, संस्था वा धर्मभावनांना दुखावणे हा हेतू नाही. सकारात्मक चर्चा साठी आम्ही सदैव तयार आहोत.वाद निर्माण करण्यासाठी नव्हे!


टिप्पण्या

  1. संवेदनशील मूदा आहे. भक्तीच्या मार्गाने असुरी आनंद शोधणाऱ्या मनोवृतीला हे पटणार नाही किव्हा तो विवेकबुद्धीचा वापर करण्याची त्यांची वृत्ती नाही.
    नवीन पिढी धर्म आणि रजकारणात गुरफटली आहे. पाटी पुस्तकं ची जागा मोबाईल ने घेतली आहे. गणेश उत्सव, कावड यात्रा आणि इतर धार्मिक सन भक्ती भाव पेक्षा बेताल वार्तानाने घेतली आहे.
    दहीहंडी ला अभंग आणि गौळण ची जागा स्टेजवर dj च्या तालावर नाच गाण्यानी घेतली आहे.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"लग्न जुळेनात ! मुले म्हणतात अपेक्षा वाढल्या, मुली म्हणतात मुले बिघडली – खरं खोटं काय?"

फोन पे गुगल पे वापरताय सावधान ! भाजी विक्रेत्याला तब्बल 29 लाखाची GST नोटीस

पावसात गेली पिके, शेतकऱ्यांना नेमकी किती मदत मिळणार समजून घ्या