बच्चू कडूंच्या आंदोलनाने सरकारला हलवलं, पण शेतकऱ्यांना काय मिळालं?

 कर्जमाफीच्या प्रतीक्षेत महाराष्ट्र – बच्चू कडूंच्या आंदोलनाने सरकारला हलवलं, पण शेतकऱ्यांना काय मिळालं?


महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफी हा मुद्दा नवीन नाही. पण निवडणुकांच्या दरम्यान दिली गेलेली आश्वासने, सरकार स्थापन झाल्यानंतर चार महिने उलटूनही अमलात न आल्याने, शेतकऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. हेच अस्वस्थतेचे रुपांतर आक्रोशात करण्याचं काम केलं….बच्चू कडू यांनी!


..

2024 मध्ये तेलंगणा सरकारने 2 लाखांपर्यंतची थेट कर्जमाफी जाहीर केली. महाराष्ट्रातही त्यानंतर 3 लाखांपर्यंतच्या कर्जमाफीची मागणी अधिक तीव्र झाली. महायुती सरकारनेही निवडणुकीच्या आधी 'पूर्ण कर्जमाफी'चं आश्वासन देत मतं खेचली. पण सरकार सत्तेत येऊन चार महिने उलटले तरी कर्जमाफीसंदर्भात कोणतीही ठोस योजना जाहीर झालेली नाही.

तीन तोंडाचे सरकार

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात, "सध्या कर्जमाफी शक्य नाही – 31 मार्चपूर्वी कर्ज भरा."

दुसरीकडे फडणवीस म्हणतात, "कर्जमाफीच्या आश्वासनाबाबत आम्ही सकारात्मक आहोत."

आणि एकनाथ शिंदे वारंवार म्हणतात, "सरकार लवकरच निर्णय घेईल."

शेतकऱ्याच्या मदतीच ढोंग...नव्या फसवणूकीचे वास्तव!

म्हणजेच, एकाच सरकारचे तीन तोंडं – वेगवेगळी भाष्यं – आणि दिशाहीन शेतकरी.


याच परिस्थितीत 8 जूनपासून गुरुकुंज मोझरी (अमरावती) येथे प्रहार पक्षाचे नेते व अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं. हा अन्नत्याग केवळ उपोषण नव्हता, तर सरकारच्या विस्मरणात गेलेल्या कर्जमाफीच्या मुद्द्याला पुन्हा एकदा जनतेसमोर उभं करण्याचा प्रयत्न होता.


बच्चू कडू यांच्या पत्नी देखील या आंदोलनात सहभागी झाल्या आणि त्यांनी सरकारला थेट सुनावलं. ही साथ जणू जिजाऊ आणि येसूबाई यांची आठवण करून देणारी ठरली. एका लोकनेत्याच्या मागे त्यांच्या कुटुंबाची उभी राहिलेली छायाचित्रं संपूर्ण महाराष्ट्रात जनतेच्या मनात विश्वास निर्माण करणारी ठरली.


त्यांच्या आंदोलनाच्या दबावामुळे अखेर सरकारकडून "कर्जमाफीबाबत सकारात्मक विचार सुरू आहे, आणि लवकरच निर्णय घेतला जाईल" अशी लेखी आश्वासने दिली गेली. पण निर्णयाचा मुहूर्त अजूनही सापडलेला नाही.


📌 शेतकऱ्यांचे प्रश्न कायम, उत्तरं धूसर

आज शेतकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत:

कर्जमाफी खरोखर होणार का?

अर्ज कसा करावा लागणार?

कुठे करावा लागणार?

किती रकमेची माफी मिळणार?

कोणी पात्र, कोणी अपात्र?



पण यातील एकाही प्रश्नाचे उत्तर सरकारकडून स्पष्टपणे मिळालेले नाही. विरोधी पक्षनेते हर्षवर्धन सपकाळ यांनी केंद्र सरकारकडून विशेष आर्थिक पॅकेज मिळवून कर्जमाफी द्यावी, अशी मागणी केली आहे. पण ही मागणी केवळ कागदावरच आहे. प्रत्यक्षात कोणताही निर्णय किंवा आर्थिक आराखडा अद्याप समोर आलेला नाही.


सरकारची खोचक रणनीती – आश्वासने, नाही कृती


22 डिसेंबर 2024 रोजी विधानसभेत फडणवीस यांनी "सर्व आश्वासने पूर्ण करू" असे जाहीर केले. पण 29 मार्च 2025 रोजी पंढरपूरमध्ये बोलताना तेच म्हणाले, "तातडीने कर्जमाफी शक्य नाही."

म्हणजे आधी गोड बोलायचं, नंतर संधी पाहून माघार घ्यायची – हीच सध्याची युती सरकारची रणनीती दिसते.


म्हणूनच, सोशल मीडियावरही कर्जमाफीबाबत अनेक चुकीच्या बातम्या आणि अफवा पसरवल्या जात आहेत. 'कर्जमाफी झाली', 'पैसे जमा झाले' अशा फेक मसेजेसमुळे शेतकरी गोंधळले आहेत.


🧭 काय शिकावं बच्चू कडू यांच्या आंदोलनाकडून?


आज सरकार विरोधात आवाज उठवणारे नेतृत्व मोडून काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जसे मनोहर जारंगे पाटील, रविकांत तुपकर यांना डावललं गेलं, तसंच बच्चू कडूंना दुर्लक्ष करण्याचा प्रयत्नही झाला. पण त्यांनी एकट्याने जनतेच्या मनात जाग निर्माण केली. आंदोलक नेत्याच्या मागे त्याची पत्नी उभी राहते, तेव्हा तो लढा वैयक्तिक राहत नाही – तो जनतेचा होतो.


बच्चू कडूंनी हे करून दाखवलं. सरकारला हलवलं, निदान आश्वासन मिळवलं. ही लढाई अजून पूर्ण झालेली नाही. पण त्यांनी उभी केलेली ठिणगी – ती जनतेच्या मनात पेट धरू शकते.

---

शेवटी प्रश्न हा आहे:

कर्जमाफी होणार का? की ही फक्त निवडणुकीपूर्वीची एक गाजरच?

आपल्या कर्जाचा भरणा शेतकऱ्यांनी करावा, की आश्वासनांवर विश्वास ठेवत राहावं?

 कर्जमाफीची आशा सोडून देऊन ज्या शेतकऱ्यांनी आपलं कर्ज खाते नियमित केलं त्या शेतकऱ्यांची काय?


ही उत्तरं सरकारने द्यायची आहेत – पण जोपर्यंत ती मिळत नाहीत, तोपर्यंत बच्चू कडूंनी दाखवलेलं आंदोलन हेच जनतेचं प्रत्यक्ष उत्तर ठरणार आहे.

 पण त्यासाठी--- सर्व शेतकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी, अपंगांनी बेरोजगारांनी सर्वांनी बच्चू कडू च्या मागे ठामपणे उभे राहणे आवश्यक आहे. असे आम्हाला वाटते तुम्हाला काय वाटते?

👉 या संदर्भात तुमचे काय मत आहे? कर्जमाफीसाठी आता आणखी काय करता येईल? तुमचे विचार खाली कमेंटमध्ये नक्की लिहा आणि हा लेख शेअर करा – जेणेकरून खरं चित्र जनतेपर्यंत पोहचेल!


गजानन खंदारे
प्रवक्ता संभाजी ब्रिगेड
वाशिम
©kamachya-goshti.com





टिप्पण्या

  1. कर्जमाफी आंदोलनाला सर्व सामाजिक, राजकीय संघटनेनं बक्कळ पाठिंबा दिला. राज्यातील विविध नेते मंडळीनी या आंदोलनात सहभागी होऊन पाठींबा दिला. त्यात शेतकरी नेते रविकांत तूपकर, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरें व संपूर्ण टीम, छञपती संभाजी राजे भोसले आणि पँथर दीपक केदार अश्या अनेक नेत्यांनी
    बच्चुभाऊच्या आंदोलनाला पाठींबा दिला. राज्यभरातील शेतकऱ्यांनी डोळे बंद करून विश्वास ठेवला. परंतु अस वाटते या कर्जमाफी आंदोलनात
    बच्चू भाऊ कडू हरले, सरकार जिंकले...

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

१००० रू महिन्याचा चा मास्तर, दोन शाळा व पेढ्यांचा मालक!

मुली व पालकांच्या या तिन अपेक्षा मुळे लग्न जुळत नाहीत