बबनराव लोणीकर लोणी खरंच पघळलं का?
परतुरचे आमदार बबनराव लोणीकर यांनी एका जाहीर कार्यक्रमात गावातील काही तरुणांवर केलेली टीका सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. भाषणात त्यांनी "तुझ्या अंगावरचे कपडे, तुझ्या पायातील बूट, तुझ्या मायचा पगार, तुझ्या बायकोच्या खात्यातले पैसे" हे सगळं सरकारने दिलं असल्याचं जाहीरपणे म्हटलं. त्यांनी सोशल मीडियावर टीका करणाऱ्यांबाबत अश्लील आणि खालच्या पातळीवरची भाषा वापरली. हे केवळ दुर्दैवीच नाही तर धोकादायकही आहे.
लोकशाहीत प्रत्येक व्यक्तीला सरकार, पक्ष किंवा नेत्यावर टीका करण्याचा अधिकार आहे. लोकप्रतिनिधी या टीकेला उत्तर देत असताना जर त्यांच्या तोंडून मग्रूर, खाजगी आणि उपहासात्मक भाषा बाहेर पडत असेल, तर ही गोष्ट गंभीरपणे विचारात घ्यायला हवी. बबनराव लोणीकर यांनी जो भाषेचा स्तर गाठला, तो लोकप्रतिनिधीला शोभणारा नाही.
त्यांनी दिलेलं स्पष्टीकरणही तितकंच हास्यास्पद होतं. ही आमची ग्रामीण बोलीभाषा आहे, आम्ही कार्टा म्हणतो, माय-बाप म्हणतो असं सांगून त्यांनी खोटं सहानुभूतीचं वातावरण निर्माण करायचा प्रयत्न केला. पण खेड्यातील भाषा म्हणजे असभ्य बोलणं असं गृहीत धरायला कोणी परवानगी दिली आहे?
सरकार कोणालाही काही देत असेल, तर ते आमदाराच्या खिशातून नाही, जनतेच्या कराच्या पैशातूनच असतं. त्यामुळे कुणीही "हे सगळं मी दिलं" असं सांगणं म्हणजे राजेशाही वृत्तीचं लक्षण आहे. लोकप्रतिनिधी हा सेवक असतो, मालक नव्हे. देशाचे पंतप्रधान स्वतःला प्रधानसेवक म्हणतात, हेच जर तळागाळात पोहोचत नसेल, तर खरे धोका याच ठिकाणी आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः हे विधान अयोग्य असल्याचं म्हटलं, हीच गोष्ट पुरेशी आहे की लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. पण भाजपमधील नेत्यांच्या वक्तव्यांचा इतिहास पाहिला, तर कधी महामानवांचा अपमान, कधी शेतकऱ्यांचा उपमर्द आणि कधी स्त्रियांचा उपहास दिसून येतो.
टीका करणाऱ्या तरुणांना कार्टा, कुचळवटा, रिकामचोट म्हणणे म्हणजे नव्या पिढीला दडपण्याचा प्रयत्न आहे. विचार विचाराने लढला पाहिजे, टीकेला उत्तर भाषेच्या सभ्यतेतून दिलं पाहिजे. पण आज सत्ता आल्यावर काही नेते "आम्हीच सर्वकाही दिलं, आम्ही नाही तर तुम्ही काहीच नाही" अशा थाटात बोलतात. ही लोकशाहीची विटंबना आहे.
बबनराव लोणीकर यांनी खरंच शेतकऱ्यांविषयी प्रेम असेल, तर त्यांनी त्यांच्यासाठी काम करावं. पण अशा प्रकारच्या भाषा वापरणं म्हणजे आपल्या अडचणी लपवण्याचा सोपा मार्ग आहे. आणि जर हेच वर्तन स्वीकारलं गेलं, तर उद्या दुसरे लोकप्रतिनिधी त्याहून वाईट भाषा वापरतील.
त्यामुळे असा प्रश्न विचारावा लागतो – बबनराव लोणीकर यांच्या डोक्यातलं लोणी खरंच पगळलं का?
काय म्हणाले बबनराव लोणीकर?
"पारावर बसणारे काही रिकामचोट तरुण लिहितात की, गावातील ९-१० लोक माझ्या दावणीला बांधलेले आहेत. ते मोदी-फडणवीसांचे अंधभक्त आहेत. हे लोक विचारतात की, मोदींनी काय दिलं? फडणवीसांनी काय दिलं? आणि आमदाराने काय दिलं? गावात जे काही मिळालं ते गेल्या २५ वर्षांत मीच दिलं. ते कुचळवाट्यावर बसलेले पाच-सहा कारटे… त्याच्या मायचा पगार बबनराव लोणीकरने केला. त्याच्या बापाला पेरणीसाठी सहा हजार रुपये पंतप्रधान मोदी यांनी दिले. तुझ्या मायच्या, तुझ्या बहिणीच्या व बायकोच्या नावावर लाडकी बहीण योजनेचे पैसे आले. तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारने दिले आहेत. तुझ्या पायातील बूट आमच्यामुळेच आहे. आमचेच पैसे घेतो आणि आमच्याच तंगड्या वर करतो. आमचंच घेतो आणि आम्हालाच बोलतो का?," असं लोणीकर म्हणाले.
काही दिवसापूर्वी हेच महाशय काय म्हणाले होते ते पहा
तहसीलदार मॅडम हिरोईनसारख्या दिसतात
लोणीकर आणखी एका वक्तव्याने वादात सापडले होते. परतूर तालुक्यात कऱ्हाळाच्या 33 केव्ही उपकेंद्राच्या लोकार्पण सोहळ्यात त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. अधिवेशनाआधी शेतकऱ्यांचा महाराष्ट्रातील सर्वात मोठा मोर्चा होऊ शकतो. या मोर्चाला 50 हजार लोक यावेत. तुम्ही सांगा कुणाला आणायचं? देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील की सुधीर मुनगंटीवार यांना आणायचं? तुम्हाला कोण वाटतंय ते सांगा, नाहीतर एखादी हिरोईन आणायची असंल तर हिरोईन पण आणू. जर कुणी हिरोईन नाहीच भेटली, तर तहसिलदार मॅडम आहेच, असं लोणीकर म्हणाले होते. त्यामुळे त्यांच्यावर चौफेर टीका झाली होती.
संदर्भ: सोशल मीडियावर प्रसारित विविध बातम्यांचा संकरित मजकूर
टीप: हा लेख केवळ समाजातील घटनांवर चिंतन करण्यासाठी लिहिला गेला आहे. कोणत्याही पक्ष, व्यक्ती किंवा समाजाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. हा एक स्वतंत्र विचारमंच आहे, जे सामाजिक सजगतेसाठी समर्पित आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा