"लग्न जुळेनात ! मुले म्हणतात अपेक्षा वाढल्या, मुली म्हणतात मुले बिघडली – खरं खोटं काय?"
ही एक बाजू आहे. पण अजून एक वास्तव बाजू आहे की आजही लग्नासाठी योग्य असलेली मुलं ग्रामीण भागात राहतात आणि ग्रामीण भागातील लोकांची नाळ अजूनही शेतीशी, मातीशी आणि आपल्या संस्कृती परंपरेशी जोडलेली आहे. त्यामुळे फक्त शहरातल्या निकषांवर मुलाचा अंदाज बांधणं नेहमी योग्य ठरत नाही.
आजच्या काळात लग्नासाठी मुलींच्या अपेक्षा काही प्रमाणात वाढल्याचं मान्य करता येईल. मात्र यामागे अनेक सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक कारणं आहेत. एकीकडे शिक्षण वाढलंय, स्वप्नं मोठी झाली आहेत, समाजात स्पर्धा प्रचंड वाढली आहे. वरच्या थरातील लोकांचं अनुकरण करण्याची प्रवृत्ती ग्रामीण आणि मध्यमवर्गीय कुटुंबात झपाट्याने पसरली आहे. त्याचा परिणाम म्हणून लग्नासाठी निकषही अवास्तव उंचावले गेले आहेत.
ग्रामीण भागातील अनेक महिला अजूनही आपल्या डोक्यावरील पदर ढळू देत नाहीत, परंपरेशी बांधील आहेत. पण शहरात मुलींचं वागणं पूर्णपणे बदलत चाललं आहे. करिअर, आधुनिक जीवनशैली आणि स्वातंत्र्याची इच्छा यातून अनेकदा पालकही अधिक उंच अपेक्षा ठेवू लागतात. समाज माध्यमांवर दररोज दिसणारे व्हिडिओ, नवी नवी जीवनशैली दाखवणारी चित्रं या सगळ्याचा तरुणाईवर खोल परिणाम होतो. परिणामी शहरात मुली दारू पिऊन धिंगाणा घालतात हेही वास्तव आपल्या डोळ्यांसमोर आहे. समाजाचं चित्र दिवसेंदिवस अधिक भयानक होत चाललं आहे.
मात्र अजूनही काही वास्तविकता वेगळी आहे. सत्य हेही आहे की काही मुली किंवा त्यांच्या घरच्यांकडून सरकारी नोकरी पाहिजेच, पंधरा ते वीस लाखांचा हुंडा पाहिजेच, सिटीमध्ये घर पाहिजेच अशा मागण्या केल्या जातात. या मागण्यांमध्ये व्यक्तीचे मूल्य आणि संस्कार मागे पडतात आणि स्थावर गोष्टींना अधिक महत्त्व दिलं जातं. ही चिंतेची बाब आहे.
समाज जीवनामध्ये वावरताना जर काही गोष्टींचं बारकाईनं निरीक्षण केलं तर अनेक तथ्य समोर येतात. गेल्या आठ दहा वर्षांत अनेक मुलींची लग्नं झाली. अनेकांनी पोटापुरता कमावणारा जावई पाहिला. मात्र लग्न झाल्यानंतर दोन चार वर्षांनी वास्तव वेगळं समोर आलं. अनेक जावयांना दारूचे व्यसन लागले. घरात भांडणं सुरू झाली. काही दारूच्या व्यसनापायी लवकरच जग सोडून गेले, काही अपघातात गेले. आज अनेक तरण्या मुली कडेवर दोन वर्षाचे लेकरू घेऊन पांढऱ्या कपाळाने निराधारच्या पगारासाठी तहसीलच्या चकरा मारताना दिसतात.
कोण म्हणते गरिबांना मुली मिळत नाहीत ? फक्त फसवणुकी पासून सावध रहा पहा vdo 
आपला जावई जर दारू पित असेल, भांडणखोर असेल, घरात खाण्याचे वांधे असतील तर आपल्या पोटच्या मुलीचे हाल पाहून कुठल्या मायबापाला चांगलं वाटेल हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. लग्न ठरवताना केवळ पगार, घर आणि मालमत्ता याकडे पाहून चालत नाही. व्यक्तिमत्त्व, स्वभाव, जबाबदारी, कुटुंबप्रेम या मूल्यांचाही विचार करायला हवा.
समाज बदलतो आहे. संस्कृती परंपरेच्या नावाखाली आपण नको ते धिंगाणे घालतो आहोत. या सर्व गोष्टींचा सारासार विचार समाज सेवकांनी आणि पालकांनी केला पाहिजे. आजच्या काळात लग्न हे केवळ दोन व्यक्तींचं नव्हे, तर दोन विचारसरणींचं आणि दोन कुटुंबांचं मिलन आहे. अपेक्षा असणं चुकीचं नाही, पण त्या यथार्थ असणं आणि परस्पर समजुतीवर आधारलेलं असणं आवश्यक आहे.
केवळ मुली मिळत नाही ही ओरड करून चालणार नाही. त्याचप्रमाणे मुलींनीही अवास्तव अपेक्षा ठेवून चालणार नाही. लग्न हे तडजोडीचं नाही तर परस्पर समजुतीचं नातं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे.
आता खरा प्रश्न असा आहे की आपण समाज म्हणून कोणत्या मूल्यांना प्राधान्य द्यायचं ठरवतो. स्थावर गोष्टी की मानवी मूल्यं. विचार मात्र प्रत्येकाने केला पाहिजे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा